विशेष प्रतिनिधी
women MLAs स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हापरिषद किंवा महापालिकांचा गाडाही महिला चालवताना दिसतात. संसद आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षणाची चर्चा होत आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 21 महिला निवडून आल्या आहेत. ही संख्या केवळ 7.26 टक्के आहे.women MLAs
महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व असावे, अशी भूमिका सर्वच पक्ष मांडतात. मात्र, प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात, असे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात केवळ २१ महिला आमदार निवडून आल्या असून, त्यात १४ महिला या केवळ भाजप या एका पक्षातीलच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये एकही महिला आमदार नाही.
२०१९ साली राज्यभरातून विधानसभेत निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या २६ होती. विधानसभा आणि संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे,यासाठी २०२३मध्ये केंद्र सरकारतर्फे नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते. ३३ टक्के महिलांना या विधेयकाच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे. राजकीय पक्षही सातत्याने महिला सन्मान आणि प्रतिनिधीत्वाची ग्वाही देत असतात. यावेळच्या निवडणुकीत महिलांचा पाठिंबा मिळविण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्यामुळे महायुतीला महिलांनी भरभरून मतेही दिल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.
मुंबईत राजकीय पक्षांकडून एकूण ३६ मतदारसंघांत ४९ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यापैकी केवळ चार महिला विजयी झाल्या आहेत. यात भाजपच्या दहिसरमधून मनिषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर, राष्ट्रवादीकडून सना मलिक व काँग्रेसकडून ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघातून कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड व बेलापूरमधून मंदा म्हात्रे निवडून आल्या आहेत.
भाजपने राज्यभरात १८ महिलांना संधी दिली होती, शिवसेना शिंदे गट ८ आणि अजित पवार गटाकडून ४ अशा पद्धतीने महायुतीकडून ३० महिला उमेदवार रिंगणात होत्या. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार (राष्ट्रवादी) ११, शिवसेना (उद्धव ठाकरे) १० व काँग्रेसने ९ अशा ३० महिलांना तिकीट दिली होती.विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.
भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार :
श्वेता विद्याधर महाले – चिखली
श्रीजया अशोकराव चव्हाण- भोकर
बोर्डीकर मेघना दीपक साकोरे – जिंतूर
स्नेहा पंडित- वसई
सुलभा गणपत गायकवाड – कल्याण पूर्व
मंदा म्हात्रे – बेलापूर
मनिषा अशोक चौधरी – दहिसर
माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
मोनिका राजीव राजळे – शेगाव
नमिता अक्षय मुंदडा – केज
अनुराधा अतुल चव्हाण – फुलंब्री
शिंदे गटाकडून विजयी महिला आमदार कोण?
मंजुळा गावित – साक्री
संजना जाधव – कन्नड
अजित पवार गट –
सुलभा खोडे – (अमरावती),
सरोज अहिरे – (देवळाली),
सना मलिक – (अनुशक्तीनगर)
आदिती तटकरे – (श्रीवर्धन)
महाविकास आघाडी
ठाकरे गट
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
प्रवीणा मोरजकर – कुर्ला
काँग्रेस
ज्योती गायकवाड – धायरी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण १० महिलांना विधानसभेसाठी संधी देण्यात आली होती. यामध्ये मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे,
अहेरी- भाग्यश्री अत्राम,घाटकोपर पूर्व- राखी जाधव
पारनेर- राणी लंके,दिंडोरी- सुनीता चारोसकर
पर्वती- अश्विनी कदम, आर्वी- मयुरा काळे, बागलाण- दीपिका चव्हाण,चंदगड- नंदिनीताई कुपेकर
पिंपरी- सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. यातील एकही महिला उमेदवार निवडून येऊ शकली नाही. मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी रद्द करण्यात आली.
काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू पाहणाऱ्या यशोमती ठाकूर, ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांचाही पराभव झाला आहे.