विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले आहे. संविधान दिनानिमित्त आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ईव्हीएममुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याचा इशारा दिला.
आव्हाड म्हणाले, “ईव्हीएममुळे निवडणुकीतील विश्वासार्हता हरवत चालली आहे. आज आम्ही फक्त पराभूत उमेदवारांची बैठक घेतली नाही, तर आम्हीही यामध्ये सहभागी झालो. अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिथे आमचे बालकिल्ले मानले जातात, तिथेही पराभव कसा काय होतो, हा प्रश्न उपस्थित होत आहे.”
रशियाचा संदर्भ देत आव्हाड म्हणाले, “ज्या प्रकारे रशियामध्ये पुतीन यांनी विरोधकांवर आक्रमण करून त्यांना संपवले, त्याच प्रकारची स्थिती भारतात उद्भवण्याची भीती आहे. आपल्याला या संकटाचा सामना करावा लागेल. देशाच्या लोकशाहीवर ही वेळ ओढवू नये यासाठी आपल्याला ईव्हीएमच्या विरोधात लढा उभारावा लागेल.”
जितेंद्र आव्हाड यांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक आंदोलनाचा दाखला देत सांगितले की, “जयप्रकाश नारायण यांनी जेव्हा देशात आंदोलन उभारले, तेव्हा मोठा बदल घडला. त्याचप्रमाणे व्ही. पी. सिंग यांनीही आपल्या काळात आवाज उठवून परिवर्तन घडवून आणले. आज शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासारखी भूमिका घ्यायला हवी आणि देशातील परिस्थिती बदलायला हवी.”
ईव्हीएमविरोधी लढ्याला फक्त निवडणूक प्रक्रिया नव्हे तर लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रश्न असल्याचे आव्हाड यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, “मी पहिल्यापासूनच ईव्हीएम विरोधात आहे. देश सध्या गंभीर संकटात सापडला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला हा लढा उभारावा लागेल. संविधान दिनाच्या दिवशी आपण संविधानाच्या रक्षणाचा निर्धार केला पाहिजे.”