विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. Nana patole criticism about maharashtra cm
नाना पटोले यांनी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदारही उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, आमच्या भेटीत पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. हा निकाल अनपेक्षित आहेच पण तो जनतेलाही मान्य नाही. जनभावना वेगळ्या आहेत, त्या भावनांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच आदर केला आहे.
ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे, मत एकाला टाकले तर ते दुसऱ्याला जाते असे मतदार सांगत आहेत तर सुप्रीम कोर्ट सिद्ध करून दाखवा असे म्हणत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे.