विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा देखील पार केला आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानपरिषदेवरील आमदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. त्या सर्वांचा विजय झाल्यामुळे विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. परंतु, काही ठिकाणी पक्ष श्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आले. त्यामुळे निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते, त्यांना आता विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते.
‘या’ नेत्यांची जागा झाली रिक्त
सध्या भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधान परिषदेवर असलेले नेते विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे विधार परिषदेत भाजच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. तर शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचीही एक जागा रिक्त झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधान परिषदेवर अजित पवार गटाची एका जागा रिक्त झाली.
नाराजांना खूश करण्याची संधी
विधान परिषदेवर रिक्त झालेल्या जागांमुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्याला संतुष्ट करण्याची संधी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या महिन्यात 6 जणांची विधान परिषदेवर वर्णी
दरम्यान, गेल्या महिन्यात विधानपरिषदेच्या 12 रिक्त जागांपैकी 6 जागांवर महायुतीच्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ पनवेलचे माजी महापौर विक्रांत पाटील, पोहरादेवीच्या गुरुगादीचे पीठाधीश धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. शिवसेनेकडून हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि सांगलीचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांची वर्णी लागली होती.