विशेष प्रतिनिधी
मुंबई : पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं. शिकलो, त्यातून पुढे गेलो. तुम्हाला दोन-चार दिवस झोप लागणार नाही. पण झोप लागल्यानंतर डोकं शांत राहील अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं. नांदेडमध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात. खरच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं. शिकलो, त्यातून पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो. मतांची टक्केवारी वाढली.
कधीपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल? यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आघाडीमध्ये वेळ लागतो. त्यांच्याकडे किती मंत्रीपद, आमच्याकडे किती मंत्रीपद? आकडा काय असेल? कोणाकडे कुठली खाती असतील? पालक मंत्री कोण असतील? याचं सूत्र तयार करावं लागेल. नुसता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीने होत नाही. त्यांच्याकडे कुठली खाती, आमच्याकडे कुठली खाती यामध्ये काही काळ जाईल, लवकरच सरकार बनेल” असे बावनकुळे म्हणाले.
सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आमच्यासोबत असलेले तिन्ही पक्ष, घटक पक्ष यांचं मत विचारात घ्यावं लागेल. सरकार पूर्ण क्षमतेने बनेल. सर्व पक्षांना न्याय देणार सरकार बनेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहे? त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद नाकारलं? त्या बद्दल मला माहित नाही’ असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.