बहुमतापर्यंत पोहोचले तरी दोन्ही आघाड्यासमोर असणार हे आव्हान

विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राचा महासंग्राम पार पडला आहे. मतदान झाले असून आता मतमोजणीची प्रतिक्षा आहे. काल सायंकाळपासून विविध माध्यम समूह आणि कंपन्यांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. त्यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष बनून महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र पूर्ण बहुमत कोणत्या आघाडीला मिळेल का याबाबत शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.

आता सरकार स्थापनेची प्रक्रिया काय असेल हे समजून घेऊ. सध्याच्या १४व्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार असल्याने त्यापूर्वी नवे सरकार राज्यात स्थापन होणे अनिवार्य आहे, असे म्हटले जात असले तरी ती वस्तुस्थिती नाही. संवैधानिकदृष्ट्या विचार केला तर २६ पूर्वी नवे सरकार येणे हे अनिवार्य नाही. केवळ त्यापूर्वी विधानसभा गठित व्हावी लागेल.

निकालाच्या दिवशी वा दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ६३ नुसार विधानसभा गठित झाल्या संदर्भातील अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील.

विधानमंडळाचे दीर्घकाळ सचिव राहिलेले अनंत कळसे याबाबत म्हणतात की, राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा पाठिंबा देणाऱ्या विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरी पत्रांसह करावा लागेल. २८८ पैकी १४५ इतके बळ बहुमतासाठी आवश्यक असेल. नेता कोण असणार तेही नमूद करावे लागेल. त्या नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी व सरकार स्थापनेस राज्यपाल आमंत्रित करतील. त्यापूर्वी राज्यपाल सदस्यांच्या पाठिंब्याची शहानिशा करू शकतील. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन होईल. यात आमदारांचा शपथविधी होईल. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभेचा कार्यकाळ असेल.

आता एक्झिट पोलचे अंदाज खरे मानले तर महायुतीला 145 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र द्यावे लागेल. त्याचवेळी आपल्या आघाडीचा नेता कोण हे देखील राज्यपालांना सांगावे लागेल. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव दिले जाईल की सर्वात मोठा पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेता म्हणून निवडले जातील याबाबत उत्सुकता आहे.

सध्याचे कल पाहता अपक्षांना ही महत्त्व येणार आहे. त्यामुळे अपक्ष कोणत्या आघाडीला पसंती देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

समजा महाविकास आघाडी बहुमतापर्यंत पोहोचली तर त्यांना त्यांच्यातील मतभेद संपवून नेत्याचे नाव कळवावे लागेल. आताच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज बघता महाविकास आघाडीला नेता निवडणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. समजा त्यांनी हे वेळेत केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट ह लागू शकते.

Challenges Await Both Alliances Despite Achieving Majority

महत्वाच्या बातम्या