महाराष्ट्रातील बालिकांचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील दोन बालिकांचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024’ प्रदान केले. या पुरस्कारासाठी देशभरातील 14 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 17 मुलांची निवड करण्यात आली होती. या मुलांमध्ये सात मुले आणि दहा मुलींचा समावेश असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन मुलींचा समावेश आहे.

राष्ट्रपती सर्व बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना म्हणाल्या की, “या मुलांनी आपल्या अद्वितीय कामगिरीमुळे देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशातील इतर मुलांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.” तसेच, या मुलांचा देशाच्या भवितव्यासाठी मोठा हातभार लागणार असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी साहिबजाद्यांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी बाल पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना म्हटले की, “ही मुले विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय मुलांचे प्रतीक आहेत.”


छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!


 

महाराष्ट्रातील बाल पुरस्कार विजेते

किया हटकर, मुंबई

मुंबईतील 14 वर्षांची किया हटकर ही एक प्रेरणादायी लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराचा सामना करताना तिने अद्भुत साहित्यिक कामगिरी केली आहे. तिच्या ‘डान्सिंग ऑन माय व्हील्स’ आणि ‘I M Possible’ या दोन पुस्तकांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. किया ही ‘I M Possible’ आणि ‘SMA-ART’ या स्वयंसेवी संस्थांची संस्थापक असून, ती अपंगत्वाबाबत जनजागृती करते.

करीना थापा, अमरावती

अमरावतीतील 17 वर्षांची करीना थापा हिने अग्नितांडवात दाखवलेल्या शौर्यामुळे हा पुरस्कार मिळवला आहे. एका भीषण आगीच्या वेळी तिने प्रसंगावधान राखत गॅस सिलिंडर वेळीच हलवून 36 लोकांचे प्राण वाचवले. तिच्या या पराक्रमाबद्दल अमरावती महानगरपालिकेने तिला ‘फायर ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून सन्मानित केले आहे.
महाराष्ट्राच्या या प्रतिभावान मुलींनी देशाच्या कर्तृत्वाचा झेंडा उंचावत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Nationally Appreciated Girls of Maharashtra, Awarded ‘Prime Minister’s National Child Award’

महत्वाच्या बातम्या