विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल अचानक प्रेम कसं काय उत्पन्न झालं ? मागील पाच वर्षे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करत होते त्यावेळी सावरकरांचे प्रेम तुम्हाला आठवलं नाही. आता अचानक आठवलं? सरडा जसा क्षणाक्षणात रंग बदलतो तसे उद्धव ठाकरे क्षणाक्षणाला सरड्यासारखे रंग बदलतात अशी बोचरी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
उध्दव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर टीका करताना कदम म्हणाले, हेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणत होते की एकतर मी राहील नाहीतर तुम्हाला संपवेल, मात्र जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो नियती त्यालाच संपवते.आज त्याच उद्धव ठाकरेंना घालीन लोटांगण वंदीन चरणी, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे, असं म्हणत फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावं लागले
कदम म्हणाले, अहंकार हा ना रावणाचा टिकला ना कंसाचा.त्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो. उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे यांनाही अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. हे प्रयत्न कोण करत होते? तेव्हा कोणाचे सरकार होते? त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? हे जे काल घालीन लोटांगण वंदीन चरण हे जे गेले होते हेच तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशाने हे सगळं घडत होतं त्यामुळे नियती प्रत्येकाला आपली जागा दाखवते.