विशेष प्रतिनिधी
नागपूर :Nana Patole अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत परभणी व बीडच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष ज्या दिवशी चर्चा करण्यास सांगतील त्या दिवशी चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप केल्याची माहिती पोलिसांना होती पण देशमुख यांची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. भाजपा सरकार आल्यानंतर दलित व बहुजन समाजावर अत्याचार केले जात आहेत का? ईव्हीएम सरकारने राज्यात राजकीय हत्यासत्र सुरु केले आहे का? असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांना कोठडीत असताना पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून ही सरकार प्रायोजीत हत्या आहे. याप्रकरणी सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
परभणीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी पवार नावाच्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते परंतु तो व्यक्ती बांग्ला देशातील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाला होता. सरपंच संतोष देशमुख सुद्दा हिंदूच आहे, त्यांचे हातपाय कापले, मृत्यूनंतर त्यांच्या शरिरावर आरोपी नाचले, त्यांना काय म्हणणार. बांग्ला देशातील हिंदू सुरक्षित नाहीत म्हणता मग भारतातील हिंदुंच्या संरक्षणाचे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परभणी व बीडचे प्रकरण मारकडवडीच्या ईव्हीएम विरोधातील मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते असेही नाना पटोले म्हणाले.
माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला किडनॅप करून ठेवले आहे. ९ कोटी रुपयांसाठी त्याला किडनॅप केले असून त्याच्याकडून ४.५ कोटी रुपये वसून केले आहेत, बाकीच्या ४.५ कोटी रुपयाच्या वसुलीसाठी त्याच्यावर अत्याचार केले जात आहेत. ही कसली वसुली आहे ? एवढे पैसे चव्हाणांकडे आले कुठून, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.
विधानसभेच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ईव्हीएम हटाव व परभणी तसेच बीडच्या मुदद्यांवर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Nana Patole demands that the government should respond to the intense anger among the people of the state over the incidents of Beed and Parbhani
महत्वाच्या बातम्या
- Bhujbal भुजबळ समर्थकांचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन
- Amit Shah : नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील तरुणांची अमित शहा यांनी घेतली भेट
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- भाजपकडून होणार हे मंत्री, सर्व समाज घटकांना आणि राज्यातील विभागांना प्रतिनिधित्व