Rajabhau waje ठाकरे गटाच्या खासदाराला स्वतःच्या गावातच गावबंदी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गद्दारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीत असताना महायुतीच्या उमेदवाराचं काम केल्याने सिन्नरच्या वडझिरे गावात खासदारांना गावबंदीचा फलक लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी खासदारांना गावबंदीचा फलक लावला आहे. ग्रामपंचायतीने तासाभरात खासदारांना गावबंदीचा फलक हटवला आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे महाविकास आघाडीतील पक्ष या पराभवाचं मंथन करत आहेत.

गद्दार खासदार वाजे असा गाव बंदी बॅनरवर उल्लेख दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांना त्यांच्या गावासह तीन ते चार गावांमध्ये गावबंदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना सिन्नर तालुक्यात ही गावबंदी करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे त्यांच्या बॅनरवर राजाभाऊ वाजे यांचे फोटो झळकल्याने हा वाद ओढवल्याची चर्चा होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात काय होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सत्तास्थानाला काही धक्का देता आला नाही. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उदय सांगळे यांची तुतारी काही वाजली नाही. महाविकास आघाडीच्या समर्थकांना हे गणित काही पचनी पडले नाही.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे पाठबळ आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाले नाही, असा समज काही जणांनी केला. त्यांनी लागलीच त्यांच्या भावना या बॅनरद्वारे झळकावल्या. त्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट गावबंदी करण्यात आली. त्यांच्यासह कुटुंबियांना गावात प्रवेश देण्यास मनाई आहे, असा फलक झळकला. यावरून नवीन वाद उफाळण्याची शक्यता लक्षात घेत, गावातील ज्येष्ठांनी लागलीच पुढाकार घेत हे बॅनर हटवले.

rajabhau-waje-mp-of-thackeray-group-banned-in-his-own-village

महत्वाच्या बातम्या