Vijaysinh Mohite Patil विजयसिंह मोहिते पाटील, सोपलांसह 33 बड्या नेत्यांना दणका; 238 कोटींच्या वसुलीचे आदेश

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह 33 जणांकडून 238 कोटी 43 लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी आमदार आणि या प्रकरणातील तक्रारदार राजेंद्र राऊत यांनी दिली. ते म्हणाले, अनियमित कर्ज वाटल्याने झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरले आहे.

232 कोटी 43 लाख रुपये व कर्ज उचलल्यापासून 12 टक्के व्याजासह रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार मी केली होती. तत्कालीन बँकेच्या संचालकांनी स्वतःच्या कारखान्यांना तसेच सहकाऱ्यांच्या कारखान्यांना अनियमित पद्धतीने खास बाब म्हणून कर्जवाटप केले होते. त्याविरोधात मी 2010 साली मी रिझर्व बॅक, नाबार्ड आणि सहकार खात्याकडे याबाबत पहिली तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली जात नसल्याने 2013 साली मी हायकोर्टामध्ये या विरोधात दाद मागितली होती.सहकार कायद्यातील कलम 88 नुसार सहकार न्याय प्राधिकरणाने चौकशी करून निकाल दिला आहे.

माझ्या तक्रारीनंतर अनियमित पद्धतीने खास बाब म्हणून वाटलेल्या कर्जाच्या मूळ मुद्दल असलेल्या 238 कोटी रुपयांच्या वसुलीला तत्कालीन संचालक मंडळ पात्र असल्याचा निकाल सहकार न्यायप्राधिकरणाने दिला आहे. कर्ज खाते बुडीत असल्यापासून ते आत्तापर्यंत व्याजासह वसुली करायची झाल्यास 1 हजार कोटी रुपयांपर्यंत वसुली करावी लागणार आहे. मागील 14 वर्षांपासून सुरूअसलेल्या लढाईचा वनवास संपून आज शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे, असे राऊत यांनी सांगितले.

अनियमितपणे कर्जाचे वाटप, कर्ज वसुली न झाल्याने अनुत्पादक कर्जात झालेली वाढ, अनियमितता या काही कारणांमुळे बँकेचे संचालक मंडळ सन 2018 मध्येच बरखास्त करण्यात आले होते. रिजर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत बँकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे.

दोषी तत्कालीन संचालकांत माजी उपमु्ख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, त्यांचे भाऊ संजय शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील अनगरकर, दिलीप माने या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या संचालकांकडून आता रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचालक मयत असतील तर त्यांच्या कायदेशीर वारसदारांकडून रकमेची वसुली करण्याचीही तरतूद आहे.

या आदेशान्वये ज्या लोकांवर नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात माजी मंत्री दिलीप सोपल (30.27 कोटी), विजयसिंह मोहिते पाटील (30.05 कोटी), दीपक साळुंखे (20.72 कोटी), सुधाकर रामचंद्र परिचारक (11.83 कोटी), अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (16.99 कोटी), भाजप आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे (11.44 कोटी), दिलीप माने (11.63 कोटी), सुनंदा बाबर (10.84 कोटी), संजय शिंदे (9.84 कोटी), दिवंगत माजी आमदार एस. एम. पाटील (8.71 कोटी), चंद्रकांत गणपतराव देशमुख (8.41 कोटी), जयवंत जगताप (7.30 कोटी) यांचा समावेश आहे.

33 big leaders including Vijaysinh Mohite Patil, Sopal; 238 crores recovery order

महत्वाच्या बातम्या